आपलेकडे, हरितक्रांती पूर्वीची शेती ही नैसर्गिक सेंद्रिय शेती होती. या शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या निविष्ठा बाजारातून विकत आणावयाची गरज नव्हती. बियाणे पारंपारिक वाणाचे बियाणे शेतकरी स्वतः जतन करून वापरत असे. खतासाठी मुबलक प्रमाणात पशुधन असल्याने सेंद्रिय खत पिकासाठी उपलब्ध होते व या पारंपारिक वाणावर फारसे किड व रोगांचा प्रार्दुभाव होत नव्हता त्यामुळे किडनाशक वापरावयाचा प्रश्नच येत नव्हता. या शेतीमध्ये शेतकरी स्वतःसाठी आवश्यक अन्नाच्या बहुतांश गरजा आपलेकडील शेतीमधून भागवत होता. या शेतीचे ज्ञान व कौशल्य हे पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत होत होती. त्यामुळे शेतीसाठी बाहेरील विकतच्या निविष्ठा व ज्ञान । कौशल्याची फारशी गरज पडत नव्हती व तशा सुविधा सुध्दा उपलब्ध नव्हत्या.
हरितक्रांतीनंतर संकरीत बियाणे आले हे संकरित वाण कमी उंचीचे व उच्च उत्पादन क्षम होते. याचे उत्पादनासाठी रासायनिक खतांची गरज होती. संकरित बियाणे व रासायनिक खताचे वापरामुळे पिकावर किड व रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने होत असल्याने त्यांचे नियंत्रणासाठी रासायनिक किडनाशकांचा वापर करावा लागत होता. हरितक्रांतीचे सुरूवातीचे टप्यामध्ये या सुधारित वाणांचा, रासायनिक खतांचा व कीडनाशकांचे वापरास, जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असल्याने व शेणखताची उपलब्धतात होत असल्याने उत्पादन वाढीचे नवनवीन उच्चांक गाठणे शक्य झाले परंतू उच्च उत्पादनाचे हव्यासापोटी एकच एक पिक मोठ्या क्षेत्रावर वर्षानुवर्षे लागवड केल्याने, शेणखताची उपलब्धता कमी झाल्याने, वातावरणातील होणाऱ्या बदलामूळे पिकांची उत्पादकता वाढीचा आलेख हळूहळू खाली येवू लागला यामधून शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत गेले व शेतकरी उत्पादन वाढीसाठी या रासायनिक निविष्ठांचा अशास्त्रीय, अवाजवी व अतिरेकी वापर करू लागले त्यामुळे तयार होणाऱ्या कृषी उत्पादनामध्ये (धान्य, फळे, भाजीपाला ई.) रसायनाचे अंश मोठ्या प्रमाणात उतरू, राहू लागले व त्यातून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला व वेगवेगळी शुगर, बीपी, कॅन्सर यासारखे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत शेतकरी, समाज व उपभोक्ता (ग्राहक) याचे स्तरावर अद्यापपर्यंत तरी गंभीरपणे विचार केलेला दिसून येत नाही.
या अतिरेकी, अविवेकी व अशास्त्रीय कृषी रसायनांचा वापर कमी करण्यासाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व पर्यायाने शेती किफायतशीर म्हणजे फायद्याची होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा व उच्च तंत्रज्ञानाबाबत अद्यावत माहिती उपलब्ध करून देणे व मानवी आरोग्यास पुरक असे अन्न तयार करणे, पर्यावरणाचा -हास टाळणे, सुक्ष्मजीव, पाणी, मातीचे आरोग्य सांभाळून शाश्वत विषमुक्त (Residue Free) अन्न तयार करते हे मोठे आव्हान आजच्या शेतीसमोर आहे त्यासाठी ज्ञानाची शेती " द्वारे शेतकऱ्यांना कृषि संशोधन संस्था मधून व प्रगतशील शेतकऱ्यांनी तयार केलेले उच्च तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे ध्येय ठेवून काम केले जाणार आहे. यासाठी शेत पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञान निविष्ठा व शेती पध्दती बाबत्त मार्गदर्शन केलेजाणार असून शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पादन वाढवणे व ग्राहकांना विषमुक्त (Residue Free) अन्न उपलब्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.
एखादी व्यक्ती ज्यावेळेस हा प्रश्न विचारते त्यावेळेस आपलेकडील तज्ञ मंडळी त्यास पीक कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन करेल परंतू शेती कशी करावी, कोणते पीक निवडावे याबाबत माहिती मार्गदर्शन मिळत नाही म्हणजेच शेती करण्याबाबत आजही आपण माती, पाणी, पीक, बाजार ई. चा तुकड्या-तुकड्याने विचार करत असतो. एकत्रितपणे " अ" ते " ज्ञ" असा शेती बाबत विचार करून अंतिम उत्तर आपण देण्यास आजही सक्षम नाही आहोत. एखाद्या व्यक्तीस कोणतेही शेतीची पार्श्वभूमी नसल्यस व नव्याने शेतीमध्ये उतरण्यासाठी याबाबत शेतीची ज्ञान व कौशल्य मिळण्याची कोणतीही सुविधा आपल्याकडे नाही असे बरेच अनुभव आज आपणास समाजात पहावयास मिळत आहेत.
शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या राज्य व केंद्र स्तरावरील कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषि विभाग, कृषी निविष्ठा उत्पादन, वितरक ई. मंडळी अग्रेसर असल्याचे दिसून येते परंतू ही सर्व मंडळी आपल्याकडील तोकडे ज्ञान समोरच्या व्यक्तीस देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात परंतू समोरच्या व्यक्तीची गरज, निकड याबाबत कोणताही विचार नसतो. प्रत्येक विषयातील तज्ञ त्यांचे याबाबत कोणताही विचार नसतो. प्रत्येक विषयातील तज्ञ त्यांचेकडील विस्तृत ज्ञान देतो परंतू त्याला ईतर किरकोळ । छोट्याशा विषयाबाबत काहीही माहिती नसते. म्हणजेच पिक उत्पादनाची माहिती असलेला तज्ञ हा किड व रोगाबाबत अनभिज्ञ असतो व रासायनिक खताचा तज्ञ हा तणनाशकाबाबतची माहिती विचारली तर कावरा बावरा होतो. एकंदरच प्रत्येक तज्ञ व्यक्ती आपलेकडील ज्ञानाचे आधारे स्वतःचे पोट भरत आहे परंतू समोरच्या शेतकऱ्याला आवश्यक ते देण्यास सक्षम नाही व तज्ञ मंडळी शेतकऱ्यांचे प्रश्नाचे एकत्रित उत्तर देण्यास असमर्थ आहेत. यातून हे स्पष्ट होते की विषयवार तज्ञ मंडळी भरपूर परंतू शेतकऱ्याला आवश्यक तेवढे, त्याला झेपेल तेवढे परवडणारे, असे एकत्रित ज्ञान व कौशल्य मिळण्याचे अशा संस्था / माध्यम आपलेकडे उपलब्ध नाही.
शेतीमधील उपरोक्त नमूद तज्ञ मंडळी स्वतःचे कोषाबाहेर यावयास तयार नाहीत म्हणजेच कृषी शास्त्रज्ञ स्वतः प्रयोग करत आहेत त्यांचा काही शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा होणार आहे का ? केवळ स्वतःचे पदोन्नतीसाठी उपयोगी होणार आहे का? अशा अनेक शिफारशी व ईतर सल्ले दिले जातात ज्याचा शेतकऱ्याला काडीचाही उपयोग होत नाही. तसेच शेती विभागातील अधिकारी मंडळी ही तर केवळ योजना राबविण्यासाठीचे घाण्याला जोडले आहेत आणि तेही योजना अंमलबजावणी
करताना जास्तीत जास्त अटी व शर्तीचे आडून शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक कशी होईल यासाठी ही मंडळी तत्पर असतात. शासकिय पातळीवरील ही तज्ञ, शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी मंडळी या नकारात्मक, स्वमग्न आहेत तर बाजाराचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किडनाशके, औजारे, सुक्ष्मसिंचन, ई) चे उत्पादन, वितरक, विक्रेते जोरकसपणे आपली उत्पादने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला वेगवेगळी प्रलोभने दाखवून विक्री करत आहेत. आजच्या शेतकऱ्याला वरील बाजारव्यवस्था प्रत्येक अडचणीवर उपाय पर्याय देत आहे. परंतू त्यांचा काही उपयोग आवश्यकता गरजा पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत जातो आणि उत्पन्न मात्र कमी मिळते त्यामुळे शेती तोट्याची होते.
यासाठी शेतकऱ्यांना शेतीमधील पिक निहाय, समस्या ओळखून त्या बाबतचे समाधान कसे देता येईल याबाबत कृषी संशोधन संस्था व प्रगतशील शेतकरी यांचे अनुभव एकत्रित पणे विचार करून कमी खर्चात, कमी कष्टात, वापरल्यास सोपे, सहज उपलब्ध असे तंत्रज्ञान शेतकऱ्यास ज्ञानाच्या शेती " मधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे सर्व समस्यांचे उत्तरे या एका ठिकाणी उपलब्ध करून देणे, शेती किफायतशीर करणे, विषमुक्त अन्न ग्राहकांना पुरवणे हा उद्देश ज्ञानाची शेतीमधून साध्य करण्यात येणार आहे.
एका छोट्याशा खेडेगावात 1000 ते 1200 लोकसंख्येच्या असलेल्या आणि तालुक्याच्या अंतिम / टोकाकडील गावात जन्म झालेला. घरी मोठ्या प्रमाणात शेतीवाडी ही होतीच. हंगामी कोरडवाहू पिके तसेच मोजकीच ऊस व भाजीपाला पिके सेंद्रिय पध्दतीने घेतली जात होती. एक मोठे संयुक्त । एकत्रित कुटूंब, अबाल वृध्दासह जवळपास 60 व्यक्तीचे कुंटूब ही कौटुंबिक पार्श्वभूमी.
घर आणि शेत एकच, वाड्याला लागूनच विहिर व शेत सुरू त्यामुळे घर आणि आंगण म्हणजे शेतच. मोठे कुटूंब असल्याने मित्र व सवंगडी भावंड व छोट्या वयाची जेष्ठ मंडळी यातून गावातील जि.प.शाळा नंतर बार्शी सारख्या कायम कष्ट करणाऱ्या निमशहरी 12 वी पर्यंत शिक्षण तेही स्वावलंबनाचे धडे घेत घेत पूर्ण केले. त्यानंतर वैद्यकिय शास्त्राचे मानाचे पदवी प्रवेश घेण्याएवढी टक्केवारी मिळूनसुध्दा बीएससी (कृषी) तेही पुण्याचे महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळेस सुध्दा मनामध्ये कुठे तरी शेतीशी नाळ तोडावयास मन तयार होत नव्हते म्हणून एमबीबीएस चे प्रवेशाचे पत्र लपवून ठेवले. ते घरी मित्रांना समजू दिले नाही. त्यानंतर बीएस्सी कृषी सहजरित्या उत्तम श्रेणीमध्ये उतीर्ण झाल्यावर एमएससी कृषी (म.फु.कृ.वि) राहूरीला प्रवेश मिळवला. त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे स्वप्न असते ते घेऊनच मी पण राहुरीला दाखल झालो. स्पर्धा परिक्षा व नियमित वर्गात हजेरी अशी दूहेरी कसरत करत पहिल्याच प्रयत्नात लेखा अधिकारी वर्ग 2, पोलीस अतिरिक्षक व कृषी सेवा वर्ग 2 या पदाची पाठोपाठ निवड झाली. त्यावेळेस पण इतर पदाची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचा विचार सोडू कृषी खात्यात 1993 ला रूजू झाले.
आजपर्यंत जवळपास 32 वर्षे कृषी विभागात कार्यरत असतांना नांदेड पासून नाशिक तर रायगड पासून पुणे मार्गे सोलापूर व जालना, औरंगाबाद जिल्ह्यात तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर व राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. अशा विस्तृत भूभागात काम करण्यास मिळाल्याने कापूस, सोयाबीन, मोसंबी, आंबा, द्राक्ष, डाळींब, भात, तूर ई. पिकांचे लागवडी बाबत शेतकऱ्यासोबत तसेच कृषि विद्यापीठ बऱ्याचसोबत काम करण्याचे भाग्य लाभले आणि या प्रत्येक ठिकाणी काम करताना मी कोणासाठी काम करत आहे? या कामाचा ज्यासाठी मला नेमले आहे त्याला फायदा मिळत आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला याबाबत काय वाटते? याचा विचार सुरू राहत असे म्हणजे मी स्वतःला शेतकऱ्याच्या ठिकाणी ठेवून समजून त्या कामाचा / योजनेचा उपक्रमाचा विचार करत असे त्यातून एक समज निर्माण होत गेला आणि शेती, शेतकरी, शासन, समाज व कृषि निविष्ठा उत्पादक व विक्रेते या सर्वांबाबतचे सूक्ष्म निरिक्षणातून मनाची मशागत झाली.
आज शेतीची अशी एकही समस्या नाही ज्यासाठी खाजगी उद्योजकांनी आपला प्रॉडक्टस बाजारात उपलब्ध केलेला नाही उदा. वाढ होत नाही पाण्यात विरघळणारी खते सोडा, मूळी चालत नाही ह्यूमिक वापरा, फूल निघत नाही PGR फवरा ई. एवढे सर्व समस्यांवर जर उपाययोजना किंवा उत्तर असतील तर मग शेती ही फायद्याची व्हायलाच पाहिजे. पण परिस्थिती मात्र संपूर्णपणे उलटी आहे. शेतकरी दर वर्षी डोक्यावरील कर्ज वाढवत आहे व ईतर सर्व व्यावसायिक मात्र कले कलेने वाढवत आहेत म्हणजेच शेतीचे प्रश्न वेगळे आहेत. उपाययोजना ह्या भलत्याच सुचविल्या जात आहेत किंवा केल्या जात आहेत आणि याबाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, राज्य शासन स्तरावर फार काही मूलभूत विचार होत असेल असे आज तरी वाटत नाही. एवढे सर्व उपद्व्याप करून तोट्याची शेती शेतकरी करून ग्राहकांना पोसण्याचे काम मात्र इमाने इतबारे करत आहे. ह्या सर्व प्रकारच्या नवनव्या कृषि निविष्ठाचे चांगले परिणाम होत आहेत की नाही हे शेतकऱ्याला कळत नाही परंतू त्याचे दुष्परिणाम मात्र नक्की होत आहेत. शेतीसाठी या महागड्या निविष्ठांचा रसायनांचा अशास्त्रीय, अतिरेकी व अविवेकी वापराने अन्नसाखळीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा प्रवेश झालेला असून त्याचे आरोग्यासाठी फार मोठे धोके निर्माण झालेले आहेत याबाबत सर्व स्तरावर शांतता आहे.
आजचे शेती व्यवसायावर शेतकरी समाधानी नाही म्हणजे शेतकऱ्यासाठी शेती फायदेशीर पण नाही तसेच त्यातील अन्न खाल्याने ग्राहक पण नुकसानीत आहे आणि शासकिय यंत्रणा अवाढव्य योजनांवर खर्च करून शेतकऱ्यांना त्याचा फायदासुध्दा होत नाही. अशा वेळेस आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, शेतीतून उमगलेल्या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देत असताना विषमुक्त अन्न निर्मितीसाठी" ज्ञानाची शेती" हा उपक्रम हाती घेतला आहे.